Sunday, February 5, 2012

किमयागार - अच्युत गोडबोले

बहुतेक वेळेस आपण जाणीवपुर्वक चांगल्या पुस्तकांचा शोध घेत असतो. परंतु, काही वेळेस मात्र एखादे पुस्तक ध्यानीमनी नसताना अवचित भेटून जाते.
आमच्या घराशेजारच्या एका वाचनालयाचे सभासद व्हायचे अनेक दिवसांपासून ठरवत होतो. गेल्या आठवड्यात सहज गेलो असता टेबलवरच अच्युत गोडबोले यांचे "किमयागार" पुस्तक दिसले. काही पानं चाळली अन वाचनालयाचा सभासद तर बनलोच, पण ते पुस्तक घेऊनच बाहेर पडलो!


"किमयागार" मध्ये आपल्याला भेटतात मूलभूत शास्त्र शाखा (पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भूगर्भशास्त्र, खगोलशास्त्र) व त्यांच्या उपशाखांमधे काम करणारे ८००हून अधिक प्रतीभावान शास्त्रज्ञ. आर्यभट्ट, अरिस्टोटल, वराहमिहीरापासून ते स्टीफन हॊकींग, जयंत नारळीकरांपर्यंत. काही विक्षिप्त, काही हेकेखोर, काही मत्सरी, काही संधीसाधू, काही दुर्दैवी... परंतु, सर्वच जण विलक्षण प्रतीभावंत. पण हे पुस्तक म्हणजे नुसतीच शास्त्रज्ञांची निरस जीवनचरीत्रें नव्हे, तर त्यांच्या माध्यमातून लेखक आपल्याला या विश्वाचा इतिहास, रचना व मानवी जीवनाची सुरूवात ऊलगडत नेतात.

पुस्तकाच्या शेवटी असणारी संदर्भग्रंथांच्या यादीवरून नुसती नजर टाकली तरी लेखनासाठी घेतलेल्या परीश्रमांची आपल्याला जाणीव होते.

प्रस्तावनेत लिहिल्याप्रमाणे या पुस्तकावर बिल ब्रायसन याच्या A Short History of Nearly Everything या उत्कृष्ट पुस्तकाचा थोडाफार प्रभाव दिसून येतो, परंतु, दोन्ही पुस्तकांचा मूळ गाभा एकच असला तरी सादरीकरणाची पध्दत मात्र भिन्न आहे.

लेखक श्री. अच्युत गोडबोले म्हणजे एक बहुआयामी व्यक्तीमत्व आहे. पहिली ते IIT पर्यंत प्रत्येक परीक्षेत पहिला क्रमांक पटकाविणारे असा त्यांचा लौकिक असून, IIT मधून रसायन शास्त्रात अभियांत्रिकी पदवी मिळविल्यावर त्यांनी संगणक क्षेत्रात ऊडी घेतली. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांमधून काम करत असताना त्यांनी व्यवस्थापनशास्त्र, शास्त्रीय संगीत, अशा अनेक प्रांतात नुसती मुशाफिरीच नाही केली तर त्या- त्या विषयांचा सखोल अभ्यास करून त्यावर उत्तम पुस्तके लिहीली आहेत. त्यांचे "बोर्डरूम" हे पुस्तक मी पाच वर्षांपुर्वी वाचले आणि ते सुद्धा फारच आवडले होते. आता त्यांचे "नादवेध" हे पुस्तक कधी मिळते त्याची मी वाट पाहात आहे.

"किमयागार"ची काही वैशिष्ट्ये म्हणजे संपूर्ण पुस्तक निव्वळ मराठी भाषेत असून प्रत्येक पानावर शास्त्रज्ञांची दुर्मिळ छायाचित्रे आहेत. जोडीला सुबक, नेटकी छपाई व शेकडो छायाचित्रें यामुळे पुस्तकाचे स्वरूप अधिकच सुंदर झाले आहे. पुस्तकाच्या शेवटी असणारा "नाही रे उजाडत" हा लेख प्रत्येकालाच अंतर्मुख करेल.

आजकाल ४००/- रूपयांत एखादा pizza जेमतेम येतो. त्याच किंमतीत ज्ञान-विज्ञानाची कवाडें सताड ऊघडी करणारे आणि प्रत्येकाच्याच घरात आवर्जून असावे असे हे पुस्तक आहे.

1 comment:

Raj said...

You are tagged. :)

http://rajkashana.blogspot.in/2012/04/seven-samurai-no-just-tag-game.html